बारामती (प्रतिनिधी) : दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बारामती शहरातील दुकाने आज सोमवार दि.(11) रोजी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी बारामतीकरांनी सुरक्षिततेची तमा न बाळगता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली .
बारामती शहर कोरोना मुक्त झाले तरी बारामती शहरात मात्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू होती. राज्यात इतरत्र मात्र प्रशासनाच्या नियमानुसार रेड झोन असलेल्या भागात देखील लॉकडाऊन शितल करण्यात आले होते. बारामती शहरात मात्र (12) तारखे नंतरच दुकाने सुरू होतील असे प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले होते .
दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी व्यापारी करत होते . मात्र प्रशासनाची परवानगी मिळत नव्हती. त्यानंतर बारामती सुरू करण्यासाठी 12 तारखेचा मुहूर्त का..? या मथळ्याखाली प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रशासनाने व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये रोटेशन पद्धतीने दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली. प्रशासनाच्या नियमानुसार दुकाने सुरू राहतील असे प्रांताधिकार्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याला व्यापाऱ्यांनी मान्यता देत आज सोमवार पासून दुकाने सुरू केली.
बारामती सुरू झाल्यानंतर बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांनी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. खरेदीसाठी नागरिक परिवारासह बाहेर पडले. दुकानदार आणि ग्राहक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे . मात्र तसे होताना दिसत नाही. दुकानांसमोर ग्राहकांचा गराडा दिसून येत आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. सरकारी व खासगी कार्यालयेत देखील आज दिवसभर वर्दळ राहिली.
रोटेशन पद्धतीने अशी असतील दुकाने सुरू…
सोमवार व गुरुवार – ॲटोमोबाईल्स (फक्त सर्व्हीसिंगसाठी), कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी, फोटो स्टुडिओ, स्वीट होम्स, खेळणी दुकाने, फुले व पुष्पहार दुकाने
मंगळवार व शुक्रवार – कापड दुकाने, भांडी, टेलरिंग, फुटवेअर दुकाने, रस्सी, पत्रावळी, ज्वेलरी-सोने दुकान, घड्याळाची दुकाने, सुटकेस-बॅगची दुकाने
बुधवार व शनिवार – जनरल स्टोअर्स, कटलरी, सायकल स्टोअर्स, टायर्स व पंक्चरची दुकाने, स्टील ट्रेडर्स, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर, बिल्डींग मटेरियल, पेंट, कार वॉशिंग सेंटर, डिजिटल फ्लेक्स प्रिंटींग, मातीची भांडी दुकाने, टोपल्या, बांबू इत्यादी.
जीवनावश्यक सेवा – किराणा माल, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक, बि-बियाणे, औषधे ही दुकाने रविवार वगळून रोज उघडली जाणार आहेत.