वायनाड – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केरळमधील त्यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात शाळा इमारतीचे ऑनलाईन अनावरण केले जाणार होते. मात्र, त्या समारंभाला वायनाड जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. डाव्या पक्षांची सत्ता असणाऱ्या केरळमधील त्या घडामोडीमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
समारंभासाठी केरळ सरकारची पूर्वपरवानगी घेण्यात आली नाही, असे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी तो आयोजित न करण्याचा आदेश दिला. त्यामुळे राहुल यांच्या हस्ते होणारे ऑनलाईन अनावरण रद्द करण्याची वेळ आली.
त्यानंतर राजकीय कारणांवरून समारंभ रोखण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला. तो आरोप सत्तारूढ माकपचे स्थानिक आमदार सी. के. शशिंद्रन यांनी फेटाळून लावला. केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत शाळेच्या इमारतीचा विस्तार करण्यात आला.
त्यामुळे राज्य सरकारला कळवून तो समारंभ आयोजित केला जायला हवा होता. तो समारंभ रद्द करण्यात आलेला नाही. राज्य सरकारची परवानगी घेऊन त्याचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले.