पूर्व हवेली तालुक्‍यात नर्सरी व्यवसायावर महसूलची दंडेलशाही

मातीचा ढिगारा पाहून तहसीलदारांची धडक कारवाई : तरुण शेतकऱ्यांतून संताप

उरुळी कांचन – उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी नर्सरी व्यवसाय करतात. परंतु हवेलीचे तहसीलदार यांनी मोठ्या प्रमाणात दंड केल्याने नर्सरी व्यवसाय करणाऱ्या तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे तरूण शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पूर्व हवेलीतील तरूण शेतकरी सोरतापवाडी, कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ परिसरात मोठ्या प्रमाणात नर्सरीचे व्यवसाय करतात. विविध प्रकारची रोपे तयार करतात. रोपे तयार करण्यासाठी माती लागत असल्याने हे तरूण माती विकत घेतात. या व्यवसायासाठी अनेक तरुणांनी बॅंक, पतसंस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतली आहेत. नर्सरी वाढविले. मात्र, गौण खनिजाचा उपसा केला म्हणून हवेलीचे तहसीलदार यांनी मातीनुसार दंड लावला आहे. या दंडाचा बोजा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर चढविल्याने नर्सरी व्यवसायमध्ये नाराजी निर्माण पसरली आहे. हवेलीचे तहसीलदार यांनी सोरतापवाडी, कुंजीरवाडी, कोरेगाव मूळसह आदी गावांत जाऊन मातीनुसार एक लाख रुपयांपासून ते पंचेचाळीस लाखांपर्यंत दंड केला आहे. तहसीलदारांनी दंड आकारल्यामुळे नर्सरी व्यवसाय धोक्‍यात आला आहे.

दिलीप शितोळे व सुहास चोरगे यांनी सांगितले की, आपल्या जवळपास कोठेही माती मिळत नाही. ही माती भोर, वेल्हा, मुळशी तालुक्‍यातून आणली जाते. त्यावेळी रॉयल्टी भरतो. परंतु माती, शेणखत मिक्‍स केल्यावर ढिग दिसतो. ते पाहून तहसीलदारांनी मोठ्या प्रमाणात दंड केला आहे.

आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले की, याप्रकरणी लवकरच जिल्हा अधिकारी व व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन तोडगा काढणार आहे. भूमीपुत्रावर कधीही अन्याय होऊ देणार नाही.

माजी आमदार अशोक पवार म्हणाले की, शासनाने सांगितले की झाडे लावा. पर्यावरणाचा समतोल राखा. जर नर्सरी व्यवसाय करणाऱ्यावर अन्याय झाला तर पुणे- सोलापूर महामार्गावर आंदोलन करण्यात येईल.

पूर्व हवेली तालुक्‍यात नर्सरीत माती आढळल्याने पंचनामा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. ज्यांनी रॉयल्टी भरली नाही. त्यांच्यावर कारवाई केली आहे.

-सुनील कोळी, तहसीलदार, हवेली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.