पुणे – लाच घेणे किंवा देणे गुन्हा आहे. हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ट्रकवर कारवाई सुरू केली असताना त्यांना ऍपद्वारे 50 हजारांची लाच देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार कोलते यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नुकतीच तक्रार दिली.
याप्रकरणी दत्तात्रय हिरामण पिंगळे (वय 33, रा. देऊळगावगाडा, ता. दौंड), अमित नवनाथ कांदे (वय 29, रा. कमलविहार, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार कोलते यांनी यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चार दिवसांपूर्वी हडपसर भागातील शेवाळवाडी फाटा परिसरात बेकायदा वाळू उपसा करून निघालेल्या ट्रकवर कोलते आणि पथकाने कारवाई केली. त्या वेळी आरोपी पिंगळे याने कोलते यांना लाच देण्याचा प्रयत्न केला.
कोलते यांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यानंतर आरोपी कांदेने ऍपद्वारे कोलते यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा केले. कोलते यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त सीमा आडनाईक तपास करत आहेत.