कोलंबो – गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर फलंदाजांच्या आक्रमक कामगिरीच्या बळावर श्रीलंकेने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत आगेकूच नोंदवली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 238 धावांची मजल मारत श्रीलंकेसमोर विजयासाठी 239 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेने हे लक्ष्य 44.4 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 242 धावा करत पुर्ण केले.
यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या श्रीलंकेच्या सलामीवीरांनी 71 धावांची सलामी दिल्यानंतर अविश्का फर्नांडो (82) आणि कुसल परेरा यांनी 58 धावांची भागिदारी करत संघाला 130 धावांची मजल मारून दिली. यानंतर अँजेलो मॅथ्युज आणि कुसल मेंडिस यांनी 96 धावांची भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
And that’s a wrap, Sri Lanka do it in style and win the series 2-0 with 1-match to go!
Sri Lanka 242/3 (44.4 ov, Avishka Fernando 82, Angelo Mathews 52*, Kusal Mendis 41*, Kusal Perera 30) v BAN 238/8 #SLvBAN pic.twitter.com/8NPB2GcYoD— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) July 28, 2019
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशची सुरूवात खराब झाली. सलामीवीर सौम्य सरकार 11 तर तमिम इक्बालही 19 धावा करुन परतल्यामुळे बांगलादेशची 2 बाद 31 अशी अवस्था झाली. यानंतर आलेल्या मोहम्मद मिथूनला साथीत घेऊन मुश्फिकुर रहिमने बांगलादेशचा डाव सावरायला सुरूवात केली. मात्र, संघाचे अर्धशतक झळकावल्यानंतर मिथुनही 12 धावा करुन परतल्याने बांगलादेशची 3 बाद 52 अशी अवस्था झाली. तर, महमदुल्लाह 6 आणि सब्बीर रेहमान 11 धावा करुन परतल्याने बांगलादेशचा निम्मासंघ 88 धावांतच तंबूत परतला होता.
यावेळी सावध फलंदाजी करणाऱ्या मुश्फिकुर रहिमने मोसद्दक हुसैनला साथीत घेत संघाचा डाव सावरत शतकी मजल ओलांडून दिली. मात्र, हुसैनही 13 धावांची भर घालून परतला. यानंतर मुश्फिकुर रहिम आणि मेहंदी हसन मिर्झा यांनी संघाचा डाव सावरला.
यावेळी दोघांनीही 37.4 षटकांत बांगलादेशला 150 धावांची मजल मारुन दिला. त्यातच सावध फलंदाजी करणाऱ्या मुश्फिकुरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. अर्धशतकानंतर मुश्फिकुरने फटकेबाजी करायला सुरूवात केल्याने कासव गतीने चालललेली बांगलादेशची धावगती वाढली. त्यामुळे बांगलादेशने 45 व्या षटकांतच द्विशतकी मजल ओलांडली.
मात्र, मेहंदी हसन मिर्झा 46 धावांवर बाद झाल्याने बांगलादेशला सातवा धक्का बसला. यानंतर मुश्फिकुरने फटकेबाजी करत नाबाद 98 धावा करत बांगलादेशला 238 धावांची मजल मारून दिली.