मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या निर्णयानुसार येथून पुढे पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सना दुकानदारांना पेमेंट व्यवहारासाठी नवे प्रोप्रायटरी क्यूआर कोड जारी करता येणार नाहीत.
सध्या यूपीआय क्यूआर कोड आणि भारत क्यूआर कोड कार्यरत आहेत. ते जारी राहणार आहेत. क्यूआर कोड पद्धतीचा आढावा घेण्यासाठी दीपक पारेख यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने जारी केलेल्या शिफारशीअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतातील पेमेंट व्यवस्था इंटरऑपरेबल क्यूआर कोडनुसार व्हावी असे समितीने सुचविले आहे. सध्या यूपीआय क्यूआर कोड आणि भारत क्यूआर कोड इंटरऑपरेबल आहेत. त्यामुळे प्रोप्रायटरी क्यूआर कोडची गरज नाही.
दुकानदारांनी आगामी काळात इंटरऑपरेबल क्यूआर कोड अंगीकारावी यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. आगामी काळात इंटरऑपरेबल क्यूआर कोड अधिक प्रमाणात वापरले जावेत आणि ते लोकप्रिय व्हावेत यासाठी रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करणार आहे. दुकानदारांनी ही नवी पद्धत आत्मसात करावी असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. त्यामुळे पेमेंट व्यवस्थेचे स्टॅंडर्डायझेशन होण्यासाठी मदत होणार आहे.