पिंपरी -पिंपरी चिंचवड कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आतापर्यंत एकूण 538 कोटी 84 लाख मालमत्ता कर वसूल केला आहे. अजूनही अनेक थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसांमध्ये थकबाकीरांनी कर भरण्याचे आवाहन करसंकलन विभागाने केले आहे. अन्यथा कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केली अशा मालमत्ताधारकांचे मालमत्ता जप्ती कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ता जप्ती कारवाई मोहिमेत थकबाकी भरणा न केलेने मालमत्ता सील केल्या आहेत.
महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन आढावा घेऊन थकबाकीदाराचे मालमत्ता जप्ती मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना सुविधा व मनपा कर शास्ती वर 70 टक्के सवलत देण्यात आली आहे. ही सुविधा 31 मार्च 2022 पर्यंत आहे.
नागरिकांना मूळ कर भरणे व सवलतीचा लाभ घेण्यासाठी फक्त 3 दिवसांचा अवधी बाकी आहे. यापुढे अशी सवलत देण्यात येणार नाही. सर्व करसंकलन विभागीय कार्यालय येथील भरणा केंद्र सोमवारपासून सकाळी 9 पासून रात्री 9 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे, असे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.