पाटणा – बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 2013 साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल जाहीर केला आहे. न्यायालयाने बॉम्बस्फोटातील 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर दोघांना जन्मठेपेची आणि दोन दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय एका दोषीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बॉम्बस्फोटात 9 जण दोषी
2013 साली पाटणा येथील गांधी मैदानात झालेल्या या बॉम्बस्फोटात 79 जण जखमी झाले होते. बुधवारी या प्रकरणी न्यायालयाने 9 आरोपींना दोषी ठरवले होते, तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. विशेष सरकारी वकील लालन प्रसाद सिंह यांनी सांगितले की, एनआयए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश गुरविंदर मल्होत्रा यांनी 2013 च्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात इम्तियाज अन्सारी, मुजिबुल्ला, हैदर अली, फिरोज अस्लम, नोमन अन्सारी, इफ्तिखार, अहमद हुसैन, उमर सिद्दीकी आणि अझरुद्दीन यांना दोषी ठरवण्यात आले, तर फखरुद्दीनला पुरावे न मिळाल्याने निर्दोष घोषित करण्यात आले.
एनआयएचे वकील लालन प्रसाद सिन्हा यांनी सांगितले की, न्यायालयाने साक्षीदाराच्या जबाबाव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या तपासणीच्या आधारे हा निकाल दिला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या कटाखाली ही घटना घडवण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटाचा कट रायपूरमध्येच रचण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले. रांचीमध्ये सामान गोळा करण्यात आले आणि पाटण्यात ही घटना घडली.
11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र
या प्रकरणात एनआयएने 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, त्यापैकी एका आरोपीला त्याच्या वयामुळे बाल न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. त्यानुसार उर्वरित दहा आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयात खटला सुरू होता. दोषी ठरल्यानंतर न्यायालयाने शिक्षेवरील निर्णयासाठी 1 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली होती.
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या भाजपच्या हुंकार रॅलीचे प्रमुख वक्ते होते. नरेंद्र मोदींसह पक्षाचे नेते मंचावर पोहोचण्याच्या सुमारे 20 मिनिटे आधी मैदानात साखळी बॉम्बस्फोट झाले ज्यात 6 लोक ठार तर सुमारे 80 लोक जखमी झाले होते.