शिक्रापूर -शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील 80 वर्षीय वृद्धाचा दुसरा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. शिवतक्रार म्हाळुंगी बाधित झालेले वृद्ध हे आधी बाधित असलेल्या युवकाच्या नात्यातील असून त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची खासगी लॅबमार्फत करोना तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
छोट्याशा गावात दोन करोना रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र सदर वृद्धाची पुन्हा त्याच खासगी ठिकाणी तपासणी केली असताना दुसरा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.
त्यामुळे अहवालामध्ये तफावत कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आरोग्य विभागावर शंका व्यक्त केली जात आहे. तर प्रथम करोनाबाधित म्हणून समोर आलेल्या युवकाचे अहवाल अद्यापपर्यंत आरोग्य विभागाच्यावतीने त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आले असल्याचे युवकाच्या नातेवाइकांनी सांगितले आहे.
याबबात शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या व्यक्तिचा एक करोना अहवाल पॉझिटिव्ह तर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने या व्यक्तीचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठविले आहेत. यानंतर काय ते सिद्ध होईल.