विभागीय आयुक्त : पुण्याला करोनामुक्त करण्याचे आवाहन
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या 80 टक्के खाटा करोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
या निर्णयाला खासगी रुग्णालय व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. रुग्णालयांच्या अडचणीसंदर्भात निश्चितपणे मार्ग काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्य शासनाने करोना उपचारासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी विधानभवन येथे बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर आदी उपस्थित होते.
उपचारांचे दर निश्चित
खासगी रुग्णालयांना जे दर निश्चित करून दिले आहेत, त्याप्रमाणेच बिल आकारणी करावी लागणार आहे. करोना रुग्णांवरील उपचारासाठी दर निश्चित केले आहेत.
या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी आपल्या सेवा दिल्याच पाहिजे, असे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिला.