भोर -भोर तालुक्यातील नरे आणि नसरापूर येथील रुग्णांनी करोनावर मात केल्याने तालुका करोनामुक्त झाला होता. मात्र, हा दिलासा अत्यल्प ठरला. तर या करोनाने थेट अतिदुर्गम रायरी भागावर आघात केला. येथे मंगळवारी (दि. 19) करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. तर रविवारी (दि. 24) त्याची पत्नी आणि दोन्ही मुलीही करोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे अहवाल अद्याप येणे बाकी असल्याचे भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
रायरी येथील रेणुसेवाडीतील हा तरुण त्याची पत्नी, दोन मुलींसह मुंबईवरून बुधवारी (दि. 13) गावी आला होता. या कुटुंबास प्रशासनाने गावच्या शाळेत क्वारंटाइन केले होते. त्यानुसार गटविकास अधिकारी तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी तातडीने रायरी येथे भेट देवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली.
करोना पॉझिटिव्ह सापडलेल्या या तरुणाला त्याच्या कुटुंबीयांसह मुंबईवरून भोरला सोडण्यासाठी त्याचा भाचा व मेव्हणा घेऊन आला होते. ते त्याच गाडीने पुन्हा मुंबईला गेले. व चार दिवसांनी भाचा त्याच्या कुटुंबीयांना घेवून दापकेघरच्या कंकवाडीला परत आला आहे, त्यामुळे या सर्वांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
– विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी
रायरी येथे करोनाबाधित चार रुग्ण आढळल्याने रायरीपासून तीन किमीचा परिसर कंटेमेंट झोन तर पाच किमीचा परिसर बफर झोन उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी जाहीर केला असून रायरी गावात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
– अजित पाटील, तहसीलदार