चिपळूण – साहेब काही झाले तरी आम्हाला सोडून जाऊ नका, जे काही आहे ते सारं वाहून गेले आहे. तुम्हीच आमचे वाली आहात, अशा शब्दात महिलेने आपला आक्रोश मांडला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना तर मदतीचे आश्वासन दिलेच. शिवाय दुकानातील नासधुसीची काळजी करू नका. तुम्ही सुरक्षित आहात हे महत्त्वाचे. नुकसानीचे आम्ही पाहून घेऊ, असे व्यापाऱ्यांना आश्वस्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणमध्ये बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. मुख्यमंत्र्यांनी देखील या महिलेपुढे उभे रहात हात जोडून या महिलेचं म्हणणे ऐकून घेतले, तिला धीर दिला.
मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी अनिल परब, भास्कर जाधव, उदय सामंत, सीताराम कुंटे उपस्थित होती.
मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचे आश्वासन दिले.
तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा, अशा शब्दात ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांना आणि स्थानिकांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती.