आमदार अशोक पवार यांची खासगी रुग्णालयांना तंबी
लोणी काळभोर- करोना बाधीत रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या हवेली तालुक्यातील 14 पैकी 11 खासगी रुग्णालयात करोना बाधीत रुग्णांना मोफत उपचार मिळत नाहीत ही बाब अतिशय गंभीर आहे. आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या सर्वच खासगी रुग्णालयांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत त्वरीत सहभागी व्हावे, जे सहभागी होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार अशोक पवार यांनी दिला आहे.
हवेली तालुक्यातील खासगी रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यास काही अडचणी येत असतील तर, आमदार या नात्याने रुग्णालयांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारीही आहे. एखाद्या रुग्णालयाने जाणीवपूर्वक वरील योजनेत सहभागी होण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्यास, संबधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पहाणार नाही, असेही ते म्हणाले.
करोना बाधीत रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने हवेली तालुक्यातील विश्वराज (लोणी काळभोर), नवले (नऱ्हे), प्रयागधाम (कोरेगाव मुळ), महेशस्मृती (शेवाळेवाडी), लाईफलाईन (वाघोली), आयमॅक्स (वाघोली), केअर (वाघोली), श्लोक (शिवापूर), शिवम (कदमवाकवस्ती), पल्स (नऱ्हे), भारत संस्कृती (वाघोली), चिंतामणी (कोरेगाव मुळ), योग (मांजरी बुद्रुक) व लोटस (शेवाळेवाडी) अशी हवेली तालुक्याच्या विविध भागातील चौदा खासगी रुग्णालये ताब्यात घेतली आहेत. मात्र या 14 पैकी नवले (नऱ्हे), विश्वराज (लोणी काळभोर) व केअर (वाघोली) अशी तीनच तीन रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असल्याने, वरील तीन रुग्णालयातच करोनावरील उपचार मोफत मिळत आहेत. उर्वरीत 11 रुग्णालयात करोना बाधीत रुग्णांना 4 हजारापासुन 7 हजार रुपये दिवसाला मोजावे लागत आहेत.
- मोफत उपचार मिळणे हा नागरीकांचा हक्क –
करोनावरील मोफत उपचार मिळणे हा नागरीकांचा हक्क आहे. यामुळेच शासनाने खासगी रुग्णालये अधिगृहीत केलेली आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बील शासन महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून देत आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसातच जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा परीषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन, आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या मात्र वरील योजनेत सहभागी नसलेल्या 11 खासगी रुग्णालयांना सहभागी करुन घेण्याबाबतची विनंती करणार आहे. - आरोग्य विभागाने अधिगृहीत केलेल्या सर्व खासगी रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी होण्याबाबत सूचना यापुर्वीच केलेल्या आहेत. तर दुसरीकडे यापुर्वी खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना जिल्हा परीषदेच्या माध्यमातून 25 हजारांपासुन 1 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळावे. यासाठी डॉ. रखमाबाई राऊत अर्थसहाय्य योजना चालू करण्याबाबत जिल्हा परीषदेकडे पाठपुरावा सुरू आहे.
– डॉ. सचिन खरात, तालुका आरोग्य अधिकारी, हवेली.