वाल्हे- दुधाला व दूध पावडरला अनुदान मिळावे यासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. 2) मोफत दूध वाटप करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
दूध उत्पादकांच्या प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाल्हे येथील भाजपच्या वतीने मोफत दूध वाटप करून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सचिन लंबाते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येथील गांधी चौकामध्ये ग्रामस्थांना मोफत दुधाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कांतीलाल पवार, ऍड. सरला तिवारी, कुंडलिक पवार, प्रसाद कुमठेकर, सुनील राऊत, सचिन दोशी, बाळासाहेब पवार, राजेंद्र सासवडे, राजेंद्र ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी सचिन लंबाते यांनी आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत शेतकरी विरोधी सरकारचा निषेध व्यक्ता केला. दूध आंदोलनासाठी उपस्थितांचे आभार ऍड. सरला तिवारी यांनी मानले.