“भाजपा’मय परिसरालाच पालकमंत्र्यांची भेट
पवना आणि मुळा नदीकाठच्या संपूर्ण परिसराला पूराची झळ बसली असून हजारो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आलेली असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ भाजपाचे नगरसेवक असलेल्या नदीकाठच्या परिसराला भेट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. शहरातील ज्या-ज्या भागात पूराचा फटका बसला आहे त्या परिसराला भेट देण्याची गरज असताना पूरपरिस्थितीच्या दौऱ्यामध्येही राजकारण आणल्याची टीका करण्यात आली आहे.
पिंपरी – संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना व मुळा नदीला पूर आल्याने त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला आहे. या पूरग्रस्तांची भेट घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची विचारपूस केली. तसेच पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यावेळी त्यांनी शहरातील विविध भागाला भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक तुषार कामठे, संदीप कस्पटे, नगरसेविका आरती चोंधे, माजी नगरसेवक विनायक गायवाड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहर, मावळ तालुका, पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्र तसेच मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने पवना व मुळा नदीला पूर आला आहे.
प्रचंड पूरामुळे पवना व मुळा नदीकाठच्या रहिवाशांना त्याचा मोठा फटका बसला. मंगळवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शहरातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्त परिसराला धावती भेट दिली व नागरिकांशी
संवाद साधला.