मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर असलेल्या खंडणीच्या आरोपांवरुन त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मात्र त्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी अजून थोडा वेळ मागितला आहे. आपली प्रकृती ठीक नाही, शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे कारण देत त्यांनी ईडीकडे वेळ मागितला आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाशी संबंध असल्याने परमबीर सिंग यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख यांनी टार्गेट देऊन 100 कोटी रुपये वसूल करायला सांगितल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आपल्या पत्रात ते म्हणाले होते, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावले होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते.
साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते.