मुंबई – मुंबईच्या नागपाडा भागात कारवाईत करत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एक कोटींहून अधिक किंमतीचे चरस जप्त केले आहे. या कारवाईत एका महिला ड्रग्स पेडलरलाही अटक करण्यात आली आहे. या चरसचे कनेक्शन थेट जम्मू-काश्मीरपर्यंत असल्याचे समजते.
यासंदर्भात माहिती देताना मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे सहसंचालक समीर वानखेडे म्हणाले, जप्त केलेले दोन किलो काश्मिरी चरस जम्मू-काश्मीरमधून मुंबईत आणले गेले आणि तेथून मुंबई आणि इतर विविध भागात पुरवले जाणार होते.
नागपाडा परिसरात जम्मू-काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात चरस आणल्याची माहिती मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. ही माहिती मिळताच समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात मुंबई अमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या पथकाने काल रात्री नागपाडा भागात छापा टाकला.
या छाप्यात एनसीबीने 2 किलो काश्मिरी चरस जप्त केले, ज्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्रकरणात, एक महिला ड्रग्स पेडलरला मुंबई एनसीबीने अटक केली असून तिची कसून चौकशी केली जात आहे.