पुणे/खडकवासला –खडकवासला धरणापाठोपाठ आता पानशेत आणि वरसगाव धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पानशेत धरण 93 टक्के आणि वरसगाव धरण 83 टक्के भरले आहे. तर टेमघर धरणात 72 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा 25.06 टीएमसी म्हणजे 86 टक्के इतका आहे.
धरण परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार होती. टेमघर धरण क्षेत्रात 58, वरसगावमध्ये 26, पानशेतमध्ये 23 आणि खडकवासला धरणात 8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
सद्यःस्थितीत खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात 1 हजार 929 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणात 1.97, पानशेतमध्ये 9.87, वरसगावमध्ये 10.58 आणि टेमघरमध्ये 2.64 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.