बाबासाहेब गर्जे
पाथर्डी – माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे मंगळवारी (दि.21) आजीच्या भेटीला येत आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी परळीला आई तर पाथर्डीला मावशीची उपमा दिली होती. स्व. मुंडे यांनी जोडलेल्या नात्याचा धागा पकडून पंकजा मुंडेंनी पाथर्डीला आज्जीची उपमा दिली आहे. पंकजा मुंडे मंगळवारी मोहटोदवीचे दर्शन दर्शन घेऊन मुकुंद गर्जे यांच्या तब्येतीची विचापूस करणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत डावलल्याने पंकजा मुंडे यांनी मौन धारण केले असून, त्या चुप्पी तोडून कार्यकर्त्यांसह पक्षाला काही संदेश देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अडचणीच्या काळात पाथर्डीने मुंडेे परिवाराला नेहमीच साथ दिलेली आहे. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ या विधानानंतर पंकजा मुंडेचा पक्षांतर्गत संघर्षाचा प्रवास सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या विषयांमधून हा संघर्ष नेहमीच उफाळून येतो आहे. मुंडे समर्थक व भाजप समर्थकांमध्ये दिवसेंदिवस दरी वाढत आहे. त्याची प्रचिती पाथर्डी-शेवगाव मतदार संघात सर्वाधिक येते.
वरिष्ठ नेत्याकडून मुंडे यांचे खच्चीकरण केलेेे जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे. विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेना जाणीवपूर्वक डावलल्याची जाणीव कार्यकर्त्यांना झाल्याने समाज माध्यमातून मुंडे समर्थकांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. पाथर्डीत मुंडे समर्थक मुकुंद गर्जे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पाथर्डी तालुक्यात मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मुंडे यांनी पाथर्डी- शेवगाव मतदारसंघातून उमेदवारी केल्यास मोठ्या मताधिक्याने विजय करू, असा विश्वास समर्थक उघडपणे बोलून दाखवतात. पक्षांतर्गत सुरू असलेला खडतर प्रवास व राजकीय अडचणीच्या काळात मुंडे आज्जीच्या कुशीत येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. श्री मोहटादेवी चरणी लीन होण्यासाठी मुंडे पाथर्डीला येत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दर्शनाला जाण्यापूर्वी मुंडे कार्यकर्त्यांशी पाथर्डीत संवाद साधणार आहेत.
या संवादातून आगामी राजकीय वाटचालीचा गुरुमंत्र मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना वाटते. स्थानिक पक्षांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीतून होणारी घुसमट कार्यकर्ते मुंडे यांच्या कानावर टाकण्याच्या तयारीत आहेत. मुंडे व पाथर्डीतील समर्थकांमध्ये होणारी हितगुज राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. मुंडेंच्या स्वागतासाठी समर्थकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नगर येथून श्रीक्षेत्र मोहटादेवी गड येथे मुंडे मोटारीने येत असल्याने तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या जंगी स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.