बीड,सावरगाव – आज दसऱ्यानमित्त पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर मेळावा घेत सर्व मुंडे समर्थकांना संबोधित केले. पंकजा मुंडे आपल्या भाषणात कोणाचा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा मेळावा असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तसेच माझा संघर्ष सुरु आहे यापुढेही सुरु राहील,संघर्षाशिवाय कोणाचेही नाव होत नसल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, “मीडियाला अनेक दिवसांपासून उत्सुकता होती की पंकजा मुंडे आपल्या भाषणातून कोणावर चिखलफेक करणार परंतु मी त्यांना सांगू इच्छिते,हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही,चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. ” संघर्ष करण हे आमच्या रक्तातच आहे. ज्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली मी त्यांच्यावर कधीही वाईट बोलले का ? कधी कोणावर वयक्तिक आरोप केले का ? कधीच नाही ते आमच्या रक्तात नसल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुडच्या नव्हत्या,तुम्ही जमिनीवर बसलात गोड मानून घेतला मी तुमचे उपकार मानते अशा शब्दात जमलेल्या मुंडे समर्थकांचे यावेळी पंकजा मुंडे यांनी आभार मानले. दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या मेळाव्याच्या मुहूर्तावर पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.