मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भाजपावर हल्लाबोल केला आहे. या फटकेबाजीनंतर भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. याविषयी बोलताना, ‘सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट, बापाच्या नावाने थापा, अरे हाच खरा थापा आहे, पण त्या आधी वाफा आहे..’ अशा प्रकारचे ट्वीट त्यांनी केले आहे.
शिवाजी पार्कमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपावर चौफेर टीका केली. “अमित शाह बोलले होते की आमचं असं काही ठरलंच नव्हतं. मी आज शिवरायांच्या साक्षीनं माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की भाजपा आणि शिवसेनेचं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं,” असे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातील भाषणात म्हणाले आहेत. ही उद्धव ठाकरेंनी मारलेली थाप असल्याचे भातखळकर आपल्या ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न करत होते.
सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट…
बापाच्या नावाने थापा.
अरे हाच खरा थापा आहे…
पण त्या आधी वाफा आहे..
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 5, 2022
“नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तींच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?” असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अमित शाहांवरही जोरदार टीका केली आहे. “अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरगुती मंत्री, हेच कळत नाहीये. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडे काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड. मुंबईत येऊन म्हणे शिवसेनेला जमीन दाखवार. बघा आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत” अशा शब्दांत ठाकरेंनी अमित शाहांवर टीकास्त्र डागले आहे.