पुणे : शहरात टोळक्याकडून किरकोळ वादातून दहशत माजविण्याचे प्रकार कायम आहेत. हडपसर भागात टोळक्याकडून दहशत माजवून मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या.
याबाबत सचिन सूर्यवंशी (वय १९, रा. हरपळे आळी, फुरसुंगी) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सूर्यवंशी तीन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी निघाला होता. त्या वेळी दुचाकी भरधाव वेगाने का चालवतो, अशी विचारणा करून टोळक्याने त्याला मारहाण करण्यास सुरू केली. या भागात आमचे वर्चस्व असल्याचे सूर्यवंशीला सांगून टोळक्यातील काहीजणांनी कोयता उगारला.
सूर्यवंशीच्या घराच्या दरवाज्यावर कोयता आपटून दुचाकीची तोडफोड केली. टोळक्याने या भागात दहशत माजवून रहिवाशांना शिवीगाळ केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास राऊत तपास करत आहेत.
दरम्यान, गौरव कोलते (वय २५) या युवकाला मारहाण करून टोळक्याने दहशत माजविल्याची फुरसुंगीतील हररळे आळीत घटना घडली. कोलते याला टोळक्याने मारहाण केली. त्या वेळी त्याच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. टोळक्याने कोलतेच्या वडिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच परिसरात दहशत माजवली. सहाय्यक निरीक्षक आर. व्ही. ढावरे तपास करत आहेत.