नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्काराचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं केलं. भारतीय हॉकी संघाने नुकताच ऑलिम्पिक स्पर्धांमधील ४१ वर्षांच्या पदकांच्या दुष्काळाला ‘कांस्य’विराम दिला. या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक सुरु असतानाच हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या नावे हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत होत आहे. क्रीडा क्षेत्रात देण्यात येणारे पुरस्कार खेळाडूंच्याच नावे देण्यात यावेत असाही सूर समाजमाध्यमांवर उमटत आहे.
एकीकडे या निर्णयाचे स्वागत होत असतानाच नेटकऱ्यांनी क्रीडा मैदानांना देण्यात आलेल्या राजकीय नेतेमंडळींच्या नावांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करून दिली आहे. काही नेटकऱ्यांनी व राजकीय नेत्यांनी तर पंतप्रधानांना त्यांचे नाव देण्यात आलेल्या गुजरातेतील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानाची आठवण करून दिली.
गतवर्षी फेब्रुवारीमध्ये अहमदाबाद येथील मोटेरा अर्थात सरदार पटेल क्रीडा मैदानाचे नाव बदलून नरेंद्र मोदी क्रीडा मैदान करण्यात आले होते. याची आठवण करून देत नेटकऱ्यांनी दिल्लीतील अरुण जेटली व गुजरातेतील नरेंद्र मोदी मैदानांची नावे बदलून त्यांना क्रीडापटूंची नावे देण्यात यावीत अशी मागणी केली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने देखील नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या या निर्णयाचे स्वागत करतानाच भविष्यातील क्रीडा मैदाने देखील क्रीडापटूंच्याच नावाने उभारली जातील अशी आशा व्यक्त केली.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करताना, मोदींचा खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यामागचा हेतू राजकीय असल्याचा आरोप लगावला. ते लिहतात, “तर मोदी व जेटली यांच्या नाव ज्या स्टेडियमना दिले आहे ते बदलून दिग्गज खेळाडूंचे नाव देण्याची सुरुवात करा. सरदार पटेलांचे नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचे नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा. मेजर ध्यानचंद अमर रहे! राजीव गांधी अमर रहे!”