सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस पोस्टल मतांनी सुरवात झाली आहे. यानंतर ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीस सुरवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणीस सुरवात झाली आहे. मतमोजणी पूर्ण होण्यास सायंकाळी साडेसात ते आठ वाजतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, सुरुवातीचे कल हाती आले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादीने आघाडी कायम ठेवली आहे. सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांनी 194 मतांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपने आघाडी घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या फेरीत राष्ट्रवादीने मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फेरी अखेर भगीरथ भालके यांनी 650 मतांची आघाडी घेतली होती, तर चौथ्या फेरी अखेर 638 मतांची भालके यांची आघाडी घेतली होती, पाचव्या फेरीअखेर त्यांनी 658 मतांची आघाडी घेतली आहे, तर आता सहाव्या फेरीअखेर 194 मतांची आघाडी घेतली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांना गुलाल उधळायला व जल्लोष करायला बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राकडे कोणालाही फिरकायला परवानगी नाही. मतमोजणी केंद्रात कोव्हिड टेस्ट केलेला रिपोर्ट असेल व केंद्रात प्रवेशाची परवानगी घेतलेली असेल तरच प्रवेश दिला जात आहे.
मंगळवेढा संपूर्ण तालुका तर पंढरपूर तालुक्यातील 35 गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली.या मतदार संघाची एकूण मतदार संख्या तीन लाख 40 हजार 889 एवढी आहे. या निवडणुकीत एकूण 65.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले.