पाचगणी – पाचगणी येथे झालेल्या एका अपघातामध्ये पर्यटकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. पाचगणी येथील मुख्य रस्त्यावरील, मॅप्रो गार्डनसमोर ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये घाटकोपर ईस्ट मुंबई येथील पर्यटक जागीच ठार झाला आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (२६ जानेवारी) रोजी सायंकाळी 06:45 वा चे सुमारास मौजे गुरेघर (ता. महाबळेश्वर ) गावच्या हद्दीतील मॅप्रो गार्डनचे पार्किंगचे गेट नंबर एक समोर नीरज अरुण मेहता (वय ४६ वर्षे, राहणार घाटकोपर ईस्ट, मुंबई) पाठीमागून येणाऱ्या गाडीस रस्ता दाखवण्यासाठी थांबले होते.
त्याच वेळी, गेट नंबर एक येथील पार्किंगमधून आराम बस चालक दिगंबर कृष्णा नाईक (वय 43 वर्ष,राहणार अकोला, राज्य कर्नाटक , टेंकनकेरी ) आराम बस (क्रमांक KA/21A/ 846) पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर भरधाव वेगात घेऊन आला. दोन्ही बाजूची वाहने न पाहता रस्त्यावर उभे असलेल्या नीरज अरुण मेहता यांना पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेत नीरज मेहता हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात गाडीचा चालक दिगंबर कृष्णा नाईक याचेवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध भादंवि कलम 279, 304 ( अ ) , मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने करीत आहेत.