बर्लिन – जर्मनीत पुन्हा करोनाने डोके वर काढल्याने संपूर्ण देशात आता पुन्हा चार आठवड्यांचा अंशत: लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. रेस्टॉरंट्स, बार, सिनेमागृह आणि अन्य ऐषोआरामी सेवा बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने फ्रांन्स आणि ब्रिटननेही लाॅकडाऊन जाहीर केले आहे.
सोमवारपासून या सेवांवर हा बंदी आदेश लागू झाला आहे. पहिल्या टप्प्यात जो लॉकडाऊन पुकारण्यात आला होता त्यातुलनेत हा लॉकडाऊन सौम्य असला तरी जे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत, ते कडक स्वरूपात अंमलात येतील, असे सरकारने म्हटले आहे. या बंद मधून शाळा, अनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, सलून या सेवा वगळण्यात आल्या आहेत.
म्हणजेच ते व्यवहार सुरू ठेवण्यात येणार आहेत. साऱ्या युरोपातच करोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे दिसू लागल्याने अन्य युरोपियन देशांनीही अशीच उपाययोजना सुरू केली आहे. जर्मनीत शनिवारी एकाच दिवशी करोनाचे 19 हजार 59 रुग्ण आढळून आले होते.
एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात करोना लागू होण्याचा हा तेथील पहिलाच प्रकार होता. त्यामुळे हे निर्बंध नव्याने लागू करण्यात आले आहेत. पंधरा दिवसांनी तेथील स्थितीचा आढावा घेऊन या निर्बंधांच्या संबंधात पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
जर्मनीच्या नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना करण्यात आली आहे. रस्त्यावरील गर्दीही टाळण्याची सूचना करण्यात आली आहे.