लंडन – विजयासाठी 316 धावांचे आव्हानास सामोरे जाताना बांगलादेशचा डाव 44.1 षटकांत 221 धावांवर आटोपला. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी याने सहा गडी बाद करीत उल्लेखनीय कामगिरी केली. तर बांगलादेशकडून शकीब अल हसन याने पुन्हा एक संस्मरणीय खेळी करताना 64 धावा केल्या. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 315 धावा केल्या होत्या.
Pakistan win by 94 runs!
Shaheen finishes with six. What a performance!#PAKvBAN | #CWC19 pic.twitter.com/bH4tKe2DJr
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) July 5, 2019
शकीब अल हसन याने या स्पर्धेत 5 अर्धशतके व 2 शतके टोलवित 606 धावा केल्या. लिट्टन दास (32) व महमदुल्लाह (29) यांनी संघास विजय मिळविण्यासाठी केलेले प्रयत्नही अपुरेच ठरले. शकीब व दास यांनी 58 धावांची भागीदारीचा अपवाद वगळता त्यांच्याकडून अन्य मोठी भागीदारी झाली नाही. त्यामुळेच शेवटचा सामना जिंकण्याचे स्वप्न त्यांना साकार करता आले नाही.दोनशे धावांचा पल्ला गाठला गेला हीच त्यांच्यासाठी समाधानाची गोष्ट होती.
दरम्यान, नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने 50 षटकांत 9 बाद 315 धावा केल्या होत्या. इमाम उल हक याची शतकी खेळी व बाबर आझम याच्या 96 धावा हे त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य होते. मधल्या फळीत इमाद वासीम याने केलेली 43 धावांची खेळीही शानदार होती.
बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमान याने 75 धावांत पाच गडी बाद करीत उल्लेखनीय कामगिरी केली. बांगलादेशच्या सैफुद्दीन याने 77 धावांत 3 विकेट्स घेत रेहमान याला चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान 50 षटकांत 9 बाद 315 (इमाम उल हक 100, बाबर आझम 96, इमाद वासीम 43, मुस्तफिझूर रेहमान 5-75)
बांगलादेश 44.1 षटकांत सर्वबाद 221 (शकीब अल हसन 64, लिट्टन दास 32, महमदुल्लाह 29, शाहीन आफ्रिदी 6-35, शदाब खान 2-59)