नवी दिल्ली – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील चकवाल शहरातील कटास राज मंदिराच्या दर्शनासाठी भारताच्या 112 भाविकांना पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने पाक व्हिसा मंजूर केला आहे.
या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर भारतीय भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी जात आहेत. हे मंदिर किला कटास नावानेही ओळखले जाते. 17 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत हे भाविक पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणार आहेत, असे पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाच्यावतीने करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कटास राज मंदिर हे हिंदूंसाठीचे पवित्र तीर्थस्थान आहे. या मंदिराच्या भोवताली असलेल्या तळ्याला कटास असे संबोधले जाते. हिंदूंसाठी हे तळे पवित्र मानले जाते. पाकिस्तान- भारतादरम्यान 1974 मध्ये करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांबाबतच्या शिष्टाचाराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यपद्धतीला अनुसरून भाविकांचा हा दौरा निश्चित करण्यात आला आहे.