इस्लामाबाद – पाकिस्तानी नौदलाने आज जहाज विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे वृत्त आहे. उत्तर अरबी समुद्रात ही चाचणी घेण्यात आल्याचे नौदल प्रवक्त्याने सांगितले. जहाजाच्या पृष्ठभागावरूनच या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या. नौदलाचे प्रमुख ऍडमिरल जफर मेहमुद अब्बासी हे या चाचण्यांच्यावेळी तेथे उपस्थित होते. या चाचण्या यशस्वी झाल्यामुळे पाकिस्तानी नौदलाच्या मारक क्षमतेत मोठीच वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
आता आम्ही शत्रुच्या कोणत्याही आगळीकीचा सामना करण्यास सिद्ध आहोत असे त्यांनी नमूद केले. या क्षेपणास्त्रांची क्षमता किती किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्याची आहे, त्यात किती स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे वगैरे तांत्रिक तपशील मात्र पाकिस्तानने जाहीर केलेला नाही. ही चाचणी यशस्वी झाली म्हणजे त्यांचे निश्चीत करण्यात आलेले उद्दिष्ट किती साध्य झाले यावरही नौदलाने फारसे भाष्य केलेले नाही.