लाहोर :- भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघ पुढील सामने खेळण्यासाठी अन्य शहरांत दाखल झाला. मात्र, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी तातडीने पाकला परतण्याचा निर्णय घेतला. पाकमध्ये दाखल होताच त्यांनी मंडळाच्या सदस्यांबरोबर एक बैठक घेतली व भारतात आलेल्या अनुभवांचे कथन करत थेट आयसीसीकडे तक्रार केली आहे.
पाकिस्तानचा भारताविरुद्धचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला गेला, त्यात भारतीय संघाने विजय मिळवला व विश्वकरंडकाच्या इतिहासात पाककडून पराभूत न होण्याचा इतिहासही जपला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज महंमद रिझवानसह अन्य खेळाडूंना भारतीय पाठीराख्यांकडून झालेल्या शेरेबाजीला सामोरे जावे लागले. तसेच पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींना भारतीय दुतावासाने वेळेत व्हीसा दिला नाही त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर सगळे भारतीय संघाचेच पाठीराखे असल्याचे चित्र दिसले. या व अशा कितीतरी गोष्टींचा पाढा त्यांनी या बैठकीत वाचला व त्याची तक्रार आयसीसीकडेही केली.
आयसीसीने यावर थेट भाष्य केले नसले तरीही, यापुढील लढतींच्या वेळी जास्त सावधानता बाळगू असे पाक मंडळाला कळवले आहे. ज्या देशात सामना असतो व तोच देश खेळत असतो तेव्हा स्वाभावीकपणे त्यांचेच पाठीराखे मैदानात जास्त संख्येने उपस्थित असतात. त्यातच भारत व पाकिस्तान यांच्यातील लढत ही जागतिक क्रिकेटमधील सर्वात रंगतदार लढत असते त्यामुळे काही वेळा चाहत्यांकडून मर्यादाही ओलांडल्या जाताना दिसतात. आम्ही या गोष्टींबाबत बीसीसीआयशी चर्चा करु असे आयसीसीने सांगितले आहे.