#CWC19 : पाक आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांची हाणामारी

लंडन – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शनिवारी हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने अखेरच्या षटकात अफगाणिस्तानवर विजय मिळवला. या सामन्यातील चढ उतारांनी सामना अत्यंत रोमहर्षक झाला होता. मात्र, या सामन्याला गालाबोट लागले. दोन्ही संघाचे चाहते एकमेकांशी भिडले आणि मैदानातच हाणामारी केली. मैदानात झालेल्या या हाणामारीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय जसजसा जवळ येत होता तसे त्यांचे चाहते मैदानाच्या दिशेने धावू लागले. हे पाहून सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी एक पाकिस्तानी चाहता झेंडा घेऊन मैदानावर पाकिस्तानचा फलंदाज इमादजवळ पोहोचला होता. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत एका अफगाणी खेळाडूला दुखापतही झाली.

सामन्याच्यावेळी मैदानावरील आकाशातून दोन विमानांची उड्डाणे झाली आणि त्यांच्याकडून बलुचिस्तानच्या समर्थनार्थ बॅनर झळकावल्यानंतर हाणामारीला सुरूवात झाली. यातील एका बॅनरवर लिहिले होते की, पाकिस्तानात लोकांना गायब होण्यापासून वाचवा. तर दुसरीकडे लिहिले होते, बलुचिस्तानला न्याय द्या. आयसीसीने जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की, आम्ही काही चाहत्यांना ही हाणामारी करताना पाहिले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी तेथे उपस्थित सुरक्षारक्षक, स्थानिक पोलिस, पश्‍चिम यॉर्कशायर पोलिस सगळे मिळून काम करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.