सदाबहार गाणी, लापसीचा बेत अन् प्रवचनाने कार्यक्रमाची सांगता
देऊळगावराजे : ग्रामीण भागात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मग तो वाढदिवस असो की सण असो वा अन्य कुठला कार्यक्रम. अशा कार्यक्रमांसाठी प्रत्येकजण हा नेहमीच उत्साही असतो. परंतु अशाच कार्यक्रमांचा आधार घेऊन देऊळगावराजे येथे चक्क सरस्वती नावाच्या देशी गायचे डोहाळ जेवण घालण्यात आले. या अनोख्या डोहाळ जेवण कार्यक्रमाची जोरदार चर्चा देऊळगावराजे परिसरात चांगलीच रंगली.
पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दौंडच्या पूर्व भागातील देऊळगावराजे या गावातील चंद्रकांत पवार आणि जयश्री पवार या शेतकरी दाम्पत्याने एका देशी गायचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला आहे. त्यांनी तिचे नाव सरस्वती असे ठेवले आहे. आता या सरस्वतीच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे समजताच या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. चंद्रकांत पवार यांच्या मातोश्री कै. केशर पवार यांची खुप इच्छा होती की देशी गायचे डोहाळ जेवण करायचे, त्यामुळे त्यांनी तिचे डोहाळ जेवण करायचे ठरविले. या अनोख्या कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने सरस्वतीची प्रतिकात्मक ओटी भरण्यात आली. गायला वस्त्रालंकार व फुलांच्या हारांनी सजवण्यात आले होते. यावेळी डोहाळजेवणानिमित्त महिलांची सदाबहार गाणी झाली. यावेळी यशवंत महाराज कदम यांचे हिंदू धर्मातील गावरान गायचे महत्व या विषयावर प्रवचन पार पडले. या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त पुरणपोळीचा घास सरस्वतीला भरवून अनेकांनी तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.
पाहुण्या रावळ्यांसह गावातील महिला व ग्रामस्थांनी या डोहाळ जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी खास लापसीच्या जेवणाचा बेत ठेवला होता. तर या कार्यक्रमाला आसपासच्या गावांतील प्रतिष्ठित मान्यवरांनीदेखील आवर्जून हजेरी लावल्याने या कार्यक्रमाला रंगत आली होती.