जन्मत:च जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला “पद्मश्री’; गुलाबो सपेराच्या जीवनाची थरारक कहाणी

श्रीनिवास वारुंजीकर
पुणे – जयपूर लिटरेचर फेस्टीवल सध्या ऑनलाईन स्वरुपात सुरु आहे. यामध्ये एका चर्चासत्रात वर्ष 2016 च्या “पद्मश्री पुरस्कार’ विजेत्या गुलाबो सपेरा या राजस्थानी पारंपरिक नृत्य प्रकारांतील कलाकाराच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. गुलाबो सपेराने त्यानंतर “दै. प्रभात’साठी खास मुलाखत दिली. त्या मुलाखतीमुळे सर्वसामान्य माणसाचे हृदय पिळवटून निघाले नाही, तरच नवल. वाचूया तिची जीवनकहाणी तिच्याच शब्दांत…

“देव तारी, त्याला कोण मारी?’ या म्हणीचा प्रत्यय जर कोणाला घ्यायचा असेल, तर त्याने माझ्या जीवनचरित्राचा धांडोळा अवश्‍य घ्यावा. अजमेरजवळच्या काटद गावातील माझे वडील राजस्थानातील गारुडी म्हणजेच सपेरा… साप-मुंगुसाचा खेळ हीच रोजीरोटीची व्यवस्था. आमची जात म्हणजे घुमंत-कालबेलिया. या जातीमध्ये मुलगी जन्माला आली तर, तिला मरण्यासाठी जमिनीत जिवंत गाडतात. मी माझ्या आई-बापाचे सातवे अपत्य होते आणि मलाही माझ्या जन्मानंतर एकाच तासांत एका खड्‌डयात गवत-काट्याकुट्यांनी झाकून गाडण्यात आले होते.

मात्र, माझी आई आणि मावशी यांनी माझ्या रडण्याच्या आवाजावरुन मला शोधले आणि तब्बल सात तासांनंतर मला त्या खड्यातून बाहेर काढले आणि मी जगले. ज्या समाजात महिलांना किंवा स्त्री जन्माला जगूच दिले जात नव्हते, त्या समाजात स्त्री शिक्षणाची बात दूरच. मग मीच लहानाची मोठी होता होता आमच्या कालबेलिया समाजाची नृत्यशैली शिकू लागले. ही नृत्यशैली म्हणजे आज ज्याला तुम्ही नागिण डान्स म्हणता, त्याच्याशी साधर्म्य साधणारी नृत्यशैली आहे. गारुड्याच्या पुंगीवर जसा नाग डोलतो, तशी लवचिक हालचाल या नृत्यप्रकारात अपेक्षित असते.

लहानपणापासूनच मग गुलाबो वडिलांसमवेत गावोगावचा दौरा करु लागली आणि वडीलांच्या पुंगीवादनाबरोबर ती जिवंत साप-नागांसमवेत कालबेलिया नृत्यही करु लागली. त्यमुळे माझे बालपण भाऊ-बहिणींसमवेत नव्हे तर साप-नागांच्या सहवासात गेले. आम्ही गावात रहात नसू. एकतर जंगलात किंवा मानवी वस्तीपासून दूर. कारण आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थानच नव्हते. गारुड्याचा व्यवसाय म्हणजे साप-नागाचे विष काढून विकायचे आणि साप-मुंगसाचे खेळ करायचे. अशा लोकांना समाजात कोण स्थान देईल?

ऐशीच्या दशकात पुष्करच्या मेळ्यातील माझे नृत्य पाहून मला दिल्लीसह मोठ्या व्यासपीठांवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. वर्ष 1986 मध्ये “फेस्टीव्हल ऑफ इंडिया’मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेत झालेल्या वॉशिंग्टन येथील कार्यक्रमात कालबेलिया नृत्य सादर करण्याची संधी मला मिळाली. या कार्यक्रमाला राजीव गांधी और सोनिया गांधी हेही उपस्थित होते. त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथसमोर आणि किमान 165 देशांमध्ये कालबेलिया नृत्यशैली पोहोचवणारी ही तुमची सगळ्यांची गुलाबो आज भारतीय लोकनृत्य परंपरेची खरीखुरी पाईक ठरली आहे. “गुलामी’ आणि “बंटवारा’सारख्या सिनेमात मला जे. पी दत्ता यांनी छोट्या भूमिकाही दिल्या आणि मग मी “बिगबॉस’चा पाचवा सिझनही गाजवला होता.

स्वत:चा जिप्सी बॅंड स्थापन करुन मी त्याचे जगभर कार्यक्रम केले असून आता मी माझ्या मुलीसह हजारो जणांना कालबेलिया नृत्यशैलीचे धडे देते. अनेक देशांतून माझ्याकडे ही नृत्यशैली शिकण्यासाठी शिष्यवृत्ती घेऊन मुली येतात. डेन्मार्कमध्ये एक घर आधीच बांधल्यानंतर आता मी जयपूरमध्येही स्वत:चे घर आणि नृत्यशाळा बांधली आहे.

जन्मत:च मरण वाट्याला आलेल्या मला मिळालेले जगण्याचे वरदानच सतत नवीन काहीतरी करण्याचे बळ देते. मला माझ्यासारख्या हजारो “गुलाबो’ घडवायच्या आहेत, ज्या राजस्थानची लोकपरंपरा असलेली कालबेलिया नृत्यशैली जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.