-माधव विद्वांस
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटककार म्हणून प्रसिद्ध पद्मश्री सतीश वसंत आळेकर यांचे आज अभीष्टचिंतन. त्यांचा जन्म दिल्ली येथे 30 जानेवारी 1949 रोजी झाला. मात्र, त्यांचे शिक्षण व बालपण पुणे येथेच झाले. शालेय जीवनात “शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग त्यांनी पाहिला आणि ते भारावून गेले.
एखाद्या नाट्यप्रयोगाचा व्यक्तीच्या मनावर इतका परिणाम होऊ शकतो की आयुष्याची दिशा बदलू शकते. त्यानंतर ते नाटकाकडे ओढले गेले. वर्ष 1972 साली ते पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्सी झाले. त्याअगोदर फर्गसन कॉलेजमधून ते बी.एस्सी. झाले. फर्गसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या “दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या विनोदी नाटकात दिनू ही भूमिका साकारून त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. मात्र, त्यांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या “ओळख’, “काळोख’ नाटकांपासून सुरू झाली.
त्यानंतर भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये (“पीडीए’मध्ये) आळेकर दाखल झाले आणि “घाशीराम कोतवाल’चे सहदिग्दर्शन त्यांनी केले. डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबर “घाशीराम कोतवाल’ या नाटकासाठी त्यांनी साहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. “मेमरी’ ही त्यांची पहिली एकांकिका. “झुलता पूल’ या एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाले.थिएटर ऍकॅडमी या संस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. “मिकी आणि मेमसाब’, “महापूर’, “महानिर्वाण’, “बेगम बर्वे’ ही त्यांनी लिहिलेली नाटके थिएटर अकॅडमी या नाट्यसंस्थेने रंगमंचावर आणली.
त्यांचे “महानिर्वाण’ हे नाटक भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील मानाचा टप्पा मानले जाते. आळेकर यांनी “चिंटू’, “चिंटू-2,’ “व्हेंटिलेटर’, “भाई’, “भाई-2,’ “मी शिवाजी पार्क’, “अय्या’, “चि. व चि. सौ. का. राजवाडे अँड सन्स’, “स्माइल प्लिज’, “हाय वे’, “देऊळ बंद,’ “जाऊद्या ना बाळासाहेब’ इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तसेच “जैत रे जैत’, “कथा दोन गणपतरावांची’ ह्या चित्रपटांचे लेखनही केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची “महापूर’, “महानिर्वाण’ आदी नाटके पोहोचली. त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाले. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो.
“महापूर’, “महानिर्वाण’ या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथही लिहिले गेले. नाटक अनुवाद प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांनी काम केले आहे. त्यांना फोर्ड फाउंडेशनची प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.
त्यांनी पुणे येथील सरकारी बी. जे. मेडिकल कॉलेजमधील बायोकेमिस्ट्रीमध्ये संशोधन अधिकारी म्हणूनही काम पाहिले होते. ते वर्ष 2009 ते 2011 या कालावधीत पुणे विद्यापीठात रतन टाटा ट्रस्टच्या कार्यक्रमासाठी मानद संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो हीच मनोकामना.