पृथ्वीचा नवा आकार
न्यूयॉर्क, ता. 29 – पृथ्वीचा आकार आपण आतापर्यंत समजत आलो त्याप्रमाणे नारिंगासारखा नाही. असे द्राक्षाकृती व्हॅनगार्ड या कृत्रिम उपग्रहाने दृष्टोत्पत्तीस आणून दिले आहे. आंतरिक्ष वैज्ञानिकांनी अमेरिकेच्या पदार्थविज्ञान संघाच्या बैठकीत सांगितले, की पृथ्वीचे नवे चित्र काढता आले आहे. सव्वासहा इंच व्यासाचा आणि 3.25 पौंड वजनाचा हा उपग्रह आपल्या कक्षेतून अचूकपणे मार्गक्रमण करीत असतो. नव्या चित्राप्रमाणे पृथ्वी पीअर फळाप्रमाणे (देठाकडे निमुळत्या) आहे.
चीनच्या साम्यवादी पक्षात मतभेद नाहीत
पेकिंग – “माओ त्से तुंग यांच्याऐवजी पंतप्रधान चाऊ एन लाय यांना सोव्हिएत कॉंग्रेसला, चिनी शिष्टमंडळाचे पुढारी म्हणून, पाठविले याचा अर्थ चिनी साम्यवादी पक्षात मतभेद आहे असा नव्हे’, असे चीनचे परराष्ट्र मंत्री मार्शल चेन यी यांनी सांगितले. चेन यी पुढे म्हणाले, की कोणीही पुढारी झाला तरी तर्ककुतर्क करून अफवा उठविण्याचे काम चालूच राहील. माओ त्से तुंगना पुढारी केले असते तर ते म्हणाले, असते की त्यांना जाण्याची सक्ती केली. आमच्यामध्ये मतभेद नाहीत.
हा घ्या समाजवादाच्या श्रेष्ठत्वाचा पुरावा
मॉस्को – कम्युनिस्ट कॉंग्रेसला पाठविलेल्या संदेशात चीनचे अध्यक्ष माओ त्से तुंग यांनी म्हटले आहे की, रशियाची नवी सप्तवार्षिक योजना हा भांडवलशाहीपेक्षा समाजवाद कसा श्रेष्ठ आहे, याचाच आणखी भरभक्कम पुरावा आहे.
समाजवादाने आपले अतुलनीय श्रेष्ठत्व प्रस्थापित केले आहे. शांतताकालीन स्पर्धेत समाजवादाने भांडवलशाहीवर मिळविलेल्या नेत्रदीपक विजयाचे हे प्रतीकच आहे. येथे भरलेल्या कम्युनिस्ट कॉंग्रेस अधिवेशनात चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय यांनी माओंचा हा संदेश वाचून दाखवला. रशियाच्या नव्या योजनेच्या अंमलबजावणीने रशियाच्या साम्यवादीकरणाचा भक्कम असा भौतिक-अध्यात्मिक पाया घातला जाईल. मार्क्स-लेनिनच्या तत्त्वज्ञानाचा उत्कर्ष होईल, असेही या संदेशात म्हटले असून, या योजनेच्या अंमलबजावणीने जगातील सत्तेचा समतोल साधला जाईल, विश्वशांतीचे उद्दात्त ध्येय गाठण्यासही ते पूरक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
साम्राज्यवाद्यांची वसाहतवादी भंगली असून ही फूट रुंदावत आहे. सर्व प्रतिगामी साम्राज्यवाद्यांना आता आपली कारस्थाने यशस्वी करणे अशक्यच ठरणार आहे. त्यांचा विनाश आता अटळ आहे, असाही माओनी इशारा दिला आहे.