वयावर मात

भारताचे इंडियन एक्‍सप्रेस म्हणून ओळखले जाणारे लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्याच काळातील नितीन कीर्तने हा एक खेळाडू. बाकी खेळाडूंनी आपली कारकीर्द खेळाडू म्हणून यशस्वी करून आता भारतीय टेनिसमध्ये पदाधिकारी म्हणूनही यशस्वी झाले आहेत. त्याचवेळी याच खेळाडूंच्या बरोबरीचा असणारा नितीन कीर्तने प्रशिक्षक म्हणून काम करतानाही एक खेळाडू म्हणूनही सातत्याने विविध स्पर्धेत यशस्वी होत आहे. एकीकडे वय वाढत असतानाही त्याची कामगिरी निश्‍चितच कौतुकास्पद ठरत आहे.

नुकत्याच पुण्यात झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नितीनने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले. त्याच्या कामगिरीची आणि कारकिर्दीचा आलेख पाहिला तर येत्या काळात त्याच्या प्रशिक्षणाखाली तयार होत असलेल्या खेळाडूंमधूनच देशाला पेस व भूपतीचे वारसदारही मिळतील असा विश्‍वास वाटतो.
कोलकाता येथे झालेल्या आयटीएफ कोलकाता साउथ क्‍लब सीनियर टेनिस (ग्रेड 4) अजिंक्‍यपद स्पर्धेत पुण्याच्या नितीन कीर्तनेने 35 वर्षांवरील एकेरीचे विजेतेपद मिळविले. बंगाल टेनिस संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकेरीत नितीन कीर्तनेने अंतिम फेरीत राजस्थानच्या सहावे मानांकन असलेल्या रियाझ अहमदचा पराभव करून विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.

विजेत्या नितीन कीर्तनेला 60 आयटीएफ गुण व दहा हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. 1992 मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पाऊल ठेवल्यापासून नितीनने आश्‍चर्यकारक यश मिळवले आहे. 1992 साली महेश भूपतीसह त्याने मानाच्या विम्बल्डनच्या बॉइज गटात उपविजेतेपद मिळवले होते. स्थानिक पातळीवर स्पर्धा खेळत असताना त्याने राष्ट्रीय स्तरावरही त्यावेळी आपली मोहर उमटवली. त्यातूनच त्याला आंतरराष्ट्रीय सामने तसेच डेव्हीस करंडक स्पर्धेसाठी निवडले गेले. यातील कामगिरी पाहून त्याची अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत बॉइज गटात निवड झाली. त्याचवेळी लिअँडर पेस आणि महेश भूपती हे अत्यंत भरात होते. मात्र, भूपतीची जोडी कीर्तनेसह या स्पर्धेत उतरली होती आणि उपविजेतेपदापर्यंत त्यांनी मारलेली मजल नक्‍कीच कौतुकास्पद होती.

भूपती आणि पेस यांची जोडी जमल्यानंतर कीर्तने काहीसा मागे पडला परंतु त्याने जिद्द न सोडता आपला खेळ सुरूच ठेवला. देशातील आणि परदेशातील विविध स्पर्धांमध्ये तो सहभागी होत राहिला आणि आजवर शेकडो पदके आणि पुरस्कार त्याने मिळवले आहेत. त्याला भारतीय टेनिस महासंघाने गुणवत्ता असूनही फारशी संधी दिली नाही; पण त्याबद्दल आवाक्षरही न काढता त्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. देशातील विविध खेळाडूंसमोर नितीन कीर्तनेने एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करायला संधी कमी मिळाली तरी निराश न होता आपला खेळ आणि त्यावरील आपले प्रेम तसूभरही कमी होऊ द्यायचे नाही याचा वस्तुपाठच त्याने नवोदितांसमोर ठेवला आहे.

एकीकडे स्वतःची प्रशिक्षण अकादमी सांभाळताना दुसरीकडे विविध स्पर्धेत सहभागी होण्याची त्याची आवड हीच त्याची जमेची बाजू आहे. आज त्याच्या अकादमीत अनेक खेळाडू खेळतात, नावारूपाला येतात तसेच काही खेळाडू विविध स्तरावर कीर्तनेसारखेच यशही मिळवतात हेच त्याच्या प्रशिक्षणाचे व अकादमीचे यश आहे. वयाची चाळीशी पार करूनही जी तंदुरूस्ती आणि चपळता कीर्तनेने जपली आहे तोच आदर्श इतर खेळाडूंसाठी सर्वाधिक प्रेरणादायी ठरत आहे. ज्या वयात खेळाडू खेळ सोडून केवळ प्रशिक्षणावर लक्ष्य केंद्रित करतात त्या वयात कीर्तने स्पर्धाही खेळतो आणि आपल्या अकादमीत हाच अनुभव नवोदितांना देतो आणि त्यांच्यातून अधिकाधिक खेळाडू देशासाठी तयार करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

प्रत्येक खेळाडूची कारकीर्द कधी ना कधी तरी संपणारच असते मात्र कीर्तनेसारखे खेळाडू हीच कारकीर्द अधिकाधिक लांबवून जास्तीत जास्त अनुभव मिळवत त्याचा उपयोग आपल्या अकादमीत शिकणाऱ्या नवोदित खेळाडूंसाठी देत असतात. कीर्तनेसारखे खेळाडू देशात अधिकाधिक संख्येने पुढे आले तर भारताचा जागतिक टेनिसमध्ये दबदबा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

एकीकडे स्वतः एक खेळाडू म्हणून तो विविध स्पर्धांमध्ये खेळताना विजेतेपदही मिळवत आहे तर, दुसरीकडे एक प्रशिक्षक म्हणून नवोदित खेळाडू घडवतही आहे. त्याच्याच गुणवत्तेतून प्रेरणा घेत येत्या काळात केवळ पुण्याला किंवा राज्यालाच नाही तर देशाला पेस किंवा भूपतीचे वारसदार मिळावेत हीच अपेक्षा आहे. खरेतर देशात पेस व भूपतीनंतर जागतिक टेनिस गाजवतील असे खेळाडू फारसे निर्माण झाले नाहीत पण कीर्तनेच्या रूपाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवत या आधुनिक क्रीडा क्षेत्रात खेळाडू व प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका उत्तमरीत्या वठवणारे खेळाडू आहेत हीच नवोदितांसाठी जमेची बाजू ठरेल. पेस, भूपती, सानिया मिर्झा यांचा काळ आता संपला व नवी पिढी समोर येत आहे. त्यांच्यातून असेच जागतिक किर्तीचे खेळाडू घडावेत ही आपलीच नाही तर भारतीय टेनिस चाहत्यांचीही अपेक्षा आहे. ती पूर्ण करण्यात एक प्रशिक्षक म्हणून कीर्तनेला यश आले तर त्याच्यासह सर्वच देशवासियांचे स्वप्न पूर्ण होईल व एक दिवस पुरूष किंवा महिला एकेरीत ग्रॅण्डस्लॅम विजेता भारतीय टेनिसपटू उदयाला आलेला असेल.

– अमित डोंगरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.