पुणे – भांडण सोडविल्याच्या रागातून तरुणावर चौघांनी कोयता व तलवारीने वार केले. ही घटना विमाननगर परिसरातील यमुनानगर येथे रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तुषार राजू बनसोडे (वय 18, रा. यमुनानगर), महेश बलभीम सरोदे (वय 21), आकाश सुग्रीव घोडेस्वार (वय 21), करण भारत सोनवणे (वय 23, तिघे रा. येरवडा) या चौघांना अटक केली. याबाबत विशाल कापसे (वय 21) या तरुणाने फिर्याद दिली.
आरोपींचे करण तुजारे नावाच्या तरुणासोबत भांडण झाले होते. त्यावेळी फिर्यादीने मध्यस्थी करत ते सोडवले. त्यामुळे आरोपीच्या मनात फिर्यादीबद्दल राग होता. त्यावरून आरोपी तुषार याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेत फिर्यादी याला लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तुषारने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. त्यावेळी फिर्यादीने वार अडवला असता त्याच्या डाव्या तळहातावर व मनगटावर जखम झाली. त्यानंतर इतर आरोपींनीदेखील फिर्यादीच्या डोक्यात तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, फिर्यादीने हात आडवा लावल्यामुळे उजव्या हाताला गंभीर जखम झाली. त्यानंतर आरोपींनी तलवार व कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी करत आहेत.