बारामती – सत्ता गेल्यानंतर विकासाचा वेग मंदावेल असे वाटत होते मात्र; बारामतीच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही. विकासाचा वेग कायम राहील. राजकीय मतांतरे असू शकतात. पण जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा कामात राजकारण आणत नाही. त्यामुळे सत्ता नसताना आपली कामे अडत नसून बारामतीत लघुउद्योगांना चालना देण्यासाठी आणखी उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि १८) येथील आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, बारामती परीसरात १ लाख मुले मुली शिक्षण घेत आहेत. शहराची अर्थव्यवस्था बदलत आहे, लोकांचे राहणीमान बदलत आहे. बारामती शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. सत्ता गेल्यानंतर विकासाचा वेग मंदावेल, अस वाटत होतं. राजकीय मतांतरे असू शकतात. पण जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा कामात राजकारण आणत नाही. त्यामुळे सत्ता नसताना आपली कामे अडत नसल्याचे पवार म्हणाले.
बारामतीत लघुउद्योगांना चालना देण्यासाठी आणखी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आपण देखील त्यासाठी प्रयत्नशील आहोत. बारामतीत स्पोर्टस हब सुरु करणार असुन त्यासाठी आवश्यक निधी मंजुर झाला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडीअम समोर सुंदर शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रशस्त नाट्यगृह ,मोठे उद्यान तसेच मोठे वाचनालय उभारण्यात येणार आहे.
बारामती बाजार समिती, बारामती दुध संघ इमारतीसह आयुर्वेदीक कॉलेज इमारत आणि कऱ्हा नदी सुशोभिकरणाचे काम देखील देखणे करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन रणजित पवार यांनी प्रास्तविक केले. संचालक अविनाश लगड यांनी आभार मानले. यावेळी व्हाईस चेअरमन मनोज पोतेकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, अविनाश लगड, रोहिदास हिरवे, पौर्णिमा तावरे, पुरुषोत्तम जगताप, संग्राम सोरटे, जय पाटील, संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
त्या टुकार पोरांना सोडणार नाही –
बारामतीकरांना सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यासाठी कायदा सुव्यवस्था कडक करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. शहरात वेडेवाकडे प्रकार करणाऱ्या त्या टुकार पोरांना सोडणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. आई-वडिलांनी देखील अशा मुलांना समजावून सांगावे अशा सूचना पवार यांनी यावेळी केल्या.