पुणे – सासवड परिसरातील एका महाविद्यालयाच्या संचालकाला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नावे धमकावून तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. अक्षय सुभाष मारणे (29 ), गणेश बबनराव जगताप (40, दोघे रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे अहोत.
याबाबत महाविद्यालयाच्या संचालकांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांचे सासवड परिसरात महाविद्यालय आहे. आरोपी मारणे आणि जगताप यांनी “माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे,’ अशी धमकी देऊन सासवड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावाने धमकावून खंडणी मागितली होती.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करत आहेत.