नवी दिल्ली –भारतात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यात येत आहे. मात्र लसीच्या उत्पादनात अडचणी येण्यास सुरुवात झाली आहे. लसीसाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेने नकार दिल्याचे समोर आलं आहे.
अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने करोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मलावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती याआधी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली होती. मात्र अमेरिकेनं निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
अमेरिकेने लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध उठविण्यास नकार दिला आहे. आमचं पहिलं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना आहे. आमचे नागरिक हीच आमची जबाबदारी आहे, असं उत्तर अमेरिकेकडून देण्यात आलं आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे भारतातील लसीकरण मोहिमेला ब्रेक लागतो की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.