पुणे – शहरात कोयता गॅंगकडून दहशत माजविण्याचे सत्र अद्याप कायम असून, सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत बुधवारी रात्री पुन्हा टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याची घटना घडली. पंधरा दिवसांपूर्वी याच वसाहतीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, तपास पथकातील उपनिरीक्षकासह सात जणांचे निलंबन केले होते. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर रंगनाथ आरडे (वय 22), रोहन ऊर्फ गायसोन्या राजू आरडे (वय 21), ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय 23), जयेश ऊर्फ जयड्या दत्ता ढावरे (वय 18), वृषभ शंकर कांबळे (वय 23), अनिकेत ऊर्फ गुड्डूर रवींद्र शिंदे (वय 24), आकाश मनोज डाकले (वय 23), आदित्य ऊर्फ सॅंडी पद्माकर डाकले (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत माऊली शिंदे (वय 19) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माऊली आणि त्याचा मित्र मध्यरात्री तळजाई वसाहत परिसरात थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. तुम्ही या भागातील दादा झाला आहेत का, अशी विचारणा करुन आरोपींनी कोयते उगारले. परिसरातील एका टपरीची तोडफोड केली. नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. आम्ही या भागातील दादा आहोत. आमच्या नादी लागल, तर जीवे मारु, अशी धमकी दिली. आरोपींनी कोयते उगारुन नागरिकांना धमकावले.
मयूर आरडे याच्यावर दोन खुनाच्या प्रयत्नासह इतरही गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार लोंढे याच्यावरही खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. घटना घडल्यानंतर आरोपींना लगेचच अटक करण्यात आली आहे, असे सहकारनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाले म्हणाले.