लांब पल्ल्याच्या एसटी बस थांबत नसल्याने प्रवासी हैराण
अणे- राजुरी (ता. जुन्नर) बसस्थानकावर पाथर्डी, पारनेर, मुंबई,जामखेड, कल्याण डेपोच्या एस टी बसेस या ठिकाणी थांबत नसल्याने या ठिकाणी असणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. या विभागाच्या जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, तसेच पंचायत समीतीचे माजी सभापती दीपक औटी, तसेच सरपंच एकनाथ शिंदे व माऊली शेळके यांनी संबधित परिवहन कार्यालयात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन वारवांर दिले आहे. या खात्याचे डेपो मॅनेजरने या मार्गावरून जाणाऱ्या एसटी वाहन चालकांना राजुरी या ठिकाणी सर्व एसटी थांबतील, अशी सुचना देखील दिल्या आहेत; परंतु या मार्गावरून जाणाऱ्या बसचे वाहनचालक येथे बस थांबवत नाही. याबबत प्रवाशांनी विचारले असता सांगण्यात येते आहे की, आमच्या मशिनमध्ये राजुरी थांबा नाही.
राजुरी (ता. जुन्नर) हे गाव अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे सतरा हजाराहून अधिक आहे, तसेच या गावात समर्थ पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेज तसेच सह्याद्री व्हॅली कॉलेज ही दोन शासकीय महाविद्यालये आहेत. तसेच गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पराशर कृषी पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे साहजिकच या गावात अनेक बाहेरगावचे विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. यामुळेच संबधित खात्याने लांब पल्ल्याच्या एसटी बस राजुरी येथे थांबवाव्यात. अन्यथा अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर राजुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा येथील प्रवाशांनी दिला आहे.
- खासगी वाहनचालकांची भरभराट
राजुरी बसस्थानकात लांब पल्ल्याच्या बस थांबत नसल्याने खासगी वाहन चालकांची भरभराट होत आहे. या वाहनांचा सुळसुळाट आळेफाटा ते बेल्हे असा दिसून येत आहे. वेळेत जाण्यासाठी प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.