“तेजस्वी यादवमुळे नाही तर कोरोनामुळे आमचा पराभव…”

जेडीयूच्या नेत्यांचा अजब दावा

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात अटीतटीची यधात होताना दिसत आहे. त्यातच राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूला मोठा धक्का दिला आहे. जेडीयूनेही हा पराभव मान्य केला आहे. मात्र तेजस्वी यादवांमुळे नव्हे तर कोरोनामुळे आमचा पराभव झालाय, असा दावा जेडीयूने केला आहे. त्यामुळे जेडीयूच्या या तर्कटावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जेडीयूचे महासचिव केसी त्यागी यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना हे तर्कट मांडलं आहे. आम्हाला आमचा पराभव मान्य आहे. आम्हाला नैसर्गिक आपत्तीने पराभूत केलं आहे. नितीशकुमार नावाचा ब्रँड बिहारमधून गायब झालेला नाही आणि तेजस्वी यादवही नेते म्हणून इस्टॅब्लिश झालेले नाहीत. कोरोनामुळे लोकांची नकारात्मक मानसिकता तयार झाली. त्यामुळे आमचा पराभव झाला. राजदमुळे नाही, असे त्यागी म्हणाले.

दरम्यान, बिहारच्या राजकारणात प्रत्येक 15 वर्षानंतर मोठा बदल झालेला आहे. तीन दशकानंतर पहिल्यांदाच बिहारच्या राजकारणात युवा नेतृत्व उदयास आले आहे. सध्या बिहारमध्ये लालू-नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी तेजस्वी यादव आणि चिराग पासवान यांचे नेतृत्व उभे राहत आहे. लालू-राबडी देवींनी गेली 15 वर्षे राज्यातील सत्ता भोगली. तर नितीश कुमार यांनी 2005 पासून 2020 पर्यंत सत्ता सांभाळली. त्यामुळे बिहारमध्ये आता पुन्हा सत्ता परिवर्तन पाहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.