कार्ला, दि. 29 (वार्ताहर) -ठाकरे परिवाराची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीला मातोश्री वरून मानाची ओटी पाठविण्यात आली. शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील हे मातोश्री वरून ओटी घेऊन आले होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, मावळ तालुका संघटक सुरेश गायकवाड, पनवेल संघटक रामदास पाटील, उरण संघटक देविदास पाटील उपस्थित होते.
देवीच्या गाभाऱ्यात बबन पाटील व मच्छिंद्र खराडे यांनी देवीला ओटी अर्पण करत बाळासाहेबांच्या विचारांच्या व उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला भरघोस यश मिळू दे असे साकडे घातले. देवस्थानचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख, माजी उपसरपंच गणेश देशमुख, ऋषिकेश देशमुख, भगवान देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
देवस्थानकडून उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आई एकवीरा देवी ही ठाकरे परिवाराची कुलस्वामिनी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ठाकरे परिवारातील सर्वजण देवीच्या नवरात्र व चैत्र यात्रेला गडावर देवीची ओटी भरण्यासाठी येत असतात. मागील दोन वर्ष करोनात गेले; तर सध्या सुरु असलेले राजकीय वादळ या कारणांमुळे सलग तीन वर्षे देवीला मातोश्री वरून मानाची ओटी पाठविण्यात आली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे सहकाऱ्यांसह गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दरम्यान, आज नवरात्र उत्सवानिमित्त कार्ला गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.