माजी उपसभापती पवारांसह 100 कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन
राजगुरूनगर – कॉंग्रेसचे माजी जिल्हा युवक अध्यक्ष व खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांसह तालुक्यातील 100 पेक्षा जास्त जणांनी आज मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला प्रवेशाने तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली.
एक उमदे नेतृत्व आणि माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांचे खंदे समर्थक म्हणून अमोल पवार यांची तालुक्यात ओळख आहे. एवढेच नव्हे तर कॉंग्रेस पक्षातजिल्ह्यात त्यांचा दबदबा आहे. अमोल पवार यांनी जिल्हा कॉंग्रेस युवकचे अध्यक्षपद भूषवले. युवकांचे संघटन केले आहे.
खेड पंचायत समितीमध्ये सभापतीपद भूषवले आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता. आगामी निवडणुकी पूर्वी त्यांचा प्रवेश शिवसेनेला फायद्याचा ठरणार आहे, तर खेड तालुक्यात कॉंग्रेसला धक्का देणारा ठरणारा आहे.
तालुक्यात कॉंग्रेसचे काही निवडक व महत्त्वाचे पदाधिकारी पक्ष धरून आहेत त्यात अमोल पवार यांचे एक नाव होते; मात्र कॉंग्रेसला बायबाय केल्याने कॉंग्रेसमध्ये खिंडार पडले आहे.
आमदारकीचा उमेदवार?
तालुक्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती म्हणून अमोल पवार यांची ख्याती आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात होते. नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला आहे. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ते तयारीत आहेत. शिवसेना पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते शिवबंधनात अडकल्याने आगामी खेड विधानसभा निवडणुकीत ते दावेदार असणार अशी राजकीय चर्चा चर्चा रंगली आहे, तर रंगलेल्या चर्चेला अमोल पवार यांनी दुजोरा दिला आहे.
यांनी केला प्रवेश
अमोल पवार यांच्यासोबत खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक चेतन बोत्रे, खेड तालुका भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष राहुल येवले, कुरकुंडीचे माजी सरपंच सचिन भोकसे, कोरेगावचे माजी सरपंच अर्जुन गोगावले, करंजविहीरे माजी सरपंच सयाजी कोळेकर, खेड तालुका कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष संतोषराव भसे, कान्हेवाडी माजी सरपंच विनोद येवले, युवा नेते अभय डांगले,रोहिदास मुंगसे, सांगुर्डीचे माजी उपसरपंच गणेश भसे, विद्यमान उपसरपंच संदीप चव्हाण यांच्यासह 100 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.