पिंपरी, (प्रतिनिधी) – पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून 16 वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 मार्च ते 16 एप्रिल दरम्यानया स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह केडन्स अकॅडमी, ट्रिनीटी क्रिकेट अकॅडमी, पूना क्लब, 22 यार्ड्स अकॅडमी, डेक्कन जिमखाना, क्रिकेट नेक्स्ट अकॅडमी, आर्यन्स क्रिकेट अकॅडमी, चंद्रोस क्रिकेट अकॅडमी, अष्टपैलू झोराष्ट्रीयन अकॅडमी अशा नामांकित दहा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सुरुवातीला दोन गटात साखळी सामने होणार आहेत. गुणानुक्रमे अव्वल चार संघात दोन उपांत्य सामने 12 एप्रिल 2024 रोजी होणार आहेत. अंतिम सामना 16 एप्रिल 2024 रोजी आयोजित केला आहे. थेरगाव येथील मैदानावर 26 मार्च 2024 रोजी स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.
स्पर्धेतील सामने व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी थेरगाव, केडन्सअकॅडमी, ट्रिनीटी क्रिकेट अकॅडमी आणि आर्यन्स क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर पार पडणार आहेत. प्रत्येक सामना 45 षटकांचा आहे.
प्रत्येक सामन्यातील योद्धा खेळाडूला पदक आणि सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण 16 एप्रिल 2024 रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.