बारामती – बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२३ रोजी बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ल्ड ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ४२ किमी, २१ किमी, १० किमी अशा रनिंग कॅटेगरीमध्ये ही मॅरेथॉन संपन्न होणार आहे. त्यासाठी एकूण ८ लाख रुपये बक्षिसे असणार आहे. ५ किमी फन रनचे आयोजन देखील फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉनसाठी पात्रता निकष म्हणून बारामती पॉवर मॅरेथॉन ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांतून स्पर्धक सहभागी झाले आसल्याची माहिती बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी दिली.
www.bpmorg.com या अधिकृत वेबसाईटवर स्पर्धकांना नावनोंदणी करता येणार आहे. १० नोव्हेंबर ही नोंदणीची अंतिम तारीख असणार आहे.
“बारामतीचा सर्वांगीण विकास उलगडत फ्लॅट ट्रॅक वरून रनर्ससाठी सर्वोत्तम टाईम साधण्याची ही संधी असणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवावा” असे आवाहन आयोजक तथा बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे, सर्व विश्वस्त आणि सर्व सदस्य यांनी केले आहे.
निरोगी आयुष्याचा संदेश देत युवकांमध्ये मैदानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बारामती स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात फुल मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. ४२ किमीचे आयोजन तालुका पातळीवर पहिल्यांदा होत आहे. फुल मॅरेथॉन भरवणारा बारामती देशातील पहिला तालुका ठरेल.