सोलापूर – नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात (Nashik Drug matter) रोजच नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत असून नाशिक पोलिसांनी (Nashik police) आठ दिवसांपूर्वी सोलापूर औद्योगिक वसाहतीत छापा टाकून एमडी निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. आता पुन्हा नाशिक पोलिसांनी त्याच परिसरात दुसऱ्यांदा छापा टाकत कोट्यवधींचा माल जप्त केला आहे.
नाशिकचे ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर यात मुंबई पोलिसांसह पुणे पोलीस कसोशीने तपास करत आहेत. याच प्रकरणातील धागेदोरे समोर येत असताना सोलापूरमधून नाशिकला ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी सामनगाव एमडी प्रकरणातील संशयित सनी पगारे याने सोलापुरात सुरू केलेला एमडीचा कारखाना 27 ऑक्टोबर रोजी उद्ध्वस्त केला.
या प्रकरणात नाशिकचा मनोहर काळे (Manohar Kale) या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याने सनीच्या सांगण्यावरून वीस हजार रुपये प्रतिमहा नफ्याकरीता कारखान्याचा करार केला होता. तर काळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी वैद्यनाथ वावळ याला अटक करण्यात आली.
वावळने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेची संयुक्त पथके सोलापुरात दाखल झाली व गोदामात धाड टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत केला.