पुणे – संस्कृत प्राकृत विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व भारतरत्न पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ज्ञान परंपरा व नवीन राष्ट्रीय शैक्षिक धोरण NEP2020 या विषयावर १७ मार्च ते १८ मार्च या कालवधीमध्ये द्विदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रासाठी संपूर्ण भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी (दि. १७) विद्यापीठाच्या नामदेव सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनसत्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आय आय टी येथील प्रो. रामसुब्रह्मण्यन् हे उपस्थित राहणार आहेत.
बीजभाषण देण्यासाठी विद्यापीठाचे माजी कुलगुरु व NEP 2020 साठी नेमलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रो. नितीन करमळकर उपस्थित राहणार आहेत. सारस्वत अतिथी म्हणून प्र कुलगुरु प्रो. संजीव सोनावणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. पेन्ना मधुसूदन उपस्थित राहणार आहेत. संस्कृत विभागाचे विभागप्रमुख प्रो. देवनाथ त्रिपाठी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॅा. दिनकर मराठे व विद्यापीठातील प्रा. दिनेश रसाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.