मॉस्को – अफगाणिस्तानच्या शेजारी देशांना रशिया शस्त्रे आणि युद्धसामुग्री पुरवणार आहे. अफगाणिस्तानची सीमा ज्या देशांना जोडली गेली आहे अशा मध्य आशियातील देशांकडून शस्त्रे आणि हेलिकॉप्टर पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे, असे रशियाने म्हटले आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर ही ऑर्डर मिळाली आहे, असे रशियाने म्हटले आहे.
पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचे सदस्य असलेल्या देशांबरोबरच ज्या देशांमध्ये रशियाचे लष्करी तळ आहेत तेथून रशियाला ही शस्त्रास्त्रांची ऑर्डर मिळाली आहे. तालिबानची ताकद वाढलेली असल्याने रशियाची चिंता वाढली आहे. हेलिकॉप्टर, शस्त्रे आणि सीमा सुरक्षा उपकरणांची ऑर्डर आपल्याला मिळाली आहे, असे रशियातील शस्त्र निर्यातीची सरकारी कंपनी रशिबोरोक्सपोर्टचे प्रमुख अलेक्झांडर मिखीव्ह यांनी म्हटले आहे.
काबूलमधील नवीन नेतृत्वाविषयी रशियाला अद्याप म्हणावा तेवढा विश्वास वाटत नाही. अफगाणिस्तानातीन शरणार्थ्यांच्या रुपात दहशतवाद्यांनी घुसखोरी करू नये यासाठी रशियाने आपल्या जवळच्या देशांना सुरक्षिततेचा इशारा दिला आहे.
यासाठी उझबेकिस्तान आणि ताजिकीस्तानच्या सैन्यासह रशियाच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ एक युद्धसराव देखील केला होता. “कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायजेशन’च्या सदस्य देशांच्या सैन्याचाही या युद्धसरावामध्ये सहभाग होता. रशियाच्या नेतृत्वाखाली किरीगीजस्तानमधअयेही या लष्करी आघाडीचा युद्धसराव 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
मध्य आशियातील आणि पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचे सदस्य कोणत्याही देशांना आपला धोका नाही, असे तालिबानने म्हटले आहे. मात्र रशियाच्या पूर्वच्या घटक देशांमध्येपूर्वी अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांकडून हल्ले झाले होते.